राजर्षी छत्रपती शाहू महाराज
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 मध्ये झाला व त्यांचा मृत्यू 6 मे 1922 मध्ये झाला. त्यांचे मूळ नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे असे
होते. महाराणी आनंदीबाईनी त्यांना दत्तक घेतले व त्यांचे नाव शाहू छत्रपती असे
ठेवण्यात आले. छत्रपती शाहू महाराज व भारताचे स्वातंत्र्य यांचे अतूट नाते होते.
शाहू महाराजांचा जन्म जहागीरदार पंत जयसिंगराव घाटगे यांच्या घराण्यात झाला.
राजकोट येथील संस्थानिकांच्या मुलांसाठी असलेल्या विद्यालयात यांचे शिक्षण पूर्ण
झाले. तेथील फ्रेझर या गुरूंच्या शिक्षणाचा त्यांच्यावर प्रभाव पडला.2 एप्रिल 1894 रोजी त्यांनी कोल्हापूरच्या
प्रशासनाची सूत्रे हाती घेतली. त्या काळात देशभर कडवे क्रांतिकारक बंड करण्याच्या
तयारीत होते. पण हा छत्रपती गोरगरिबांचा, दीनदलितांच्या राजा होता, विद्वानांचा चाहता होता कलावंतांचा त्राता होता, समाजसुधारकांचा दाता
होता, शिक्षणाचा भोक्ता होता, स्थिरचित्ताने धोरणे आखणारा नेता होता, उच्चवर्णीय समाजाच्या गुलामगिरीतून गरिबांना मुक्त करणारा सत्ताधीश होता.
त्यांनी कुलकर्णी वतन नष्ट करून तलाठी पद निर्माण केले. बलुते पद्धती नष्ट केली.
पूर्वाश्रमीच्या गुन्हेगारांना मुक्त केले. प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले.
ठिकठिकाणी वसतिगृहे उभारली. तळागाळातील लोकांना मायेचा स्पर्श दिला. त्यांचे
व्यक्तिमत्व लोकोत्तर होते. कला प्रेम अगाध होते. माधवराव बागल, प्रबोधनकार ठाकरे, कर्मवीर भाऊराव पाटील, बालगंधर्व, बाबुराव पेंटर, गोविंदराव टेंबे, भालजी पेंढारकर, केशवराव भोसले, अब्दुल करीम खान, शंकरराव सरनाईक अशा गुणसंपदेचा मेळा कोल्हापुरात महाराजांनी निर्माण केला.
त्यांच्या या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कर्तृत्वाची नोंद केंब्रिज विद्यापीठाने घेऊन
त्यांना एल. एल. डी. ही सन्माननीय पदवी बहाल केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा